Monday, 26 August 2019

ते राहणार आहेत तिथेच, करोडो वर्षं...

शहराबाहेर तयार होणारे कचऱ्याचे डोंगर,
त्या रस्त्याने जाताना नाक बंद करून थोडीच जमीनदोस्त होणारेत.
ते राहणार आहेत तिथेच,
करोडो वर्षं.
आपण क्रशर चालू करून,
आहेत ते डोंगर फोडतोय कशासाठी?
याच कचऱ्याच्या डोंगरांना जागा करण्यासाठी ना!
गोष्ट झाली अशी, की मी गेल्या वर्षीपासून घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करायला सुरुवात केली.
एक दोन आठवड्यांत माझ्या लक्षात आलं,
की मी जवळ जवळ ५-६ दिवसांनीच कचऱ्याचा डबा बाहेर ठेवतेय.
कारण कचरा जास्त होतंच नव्हता,
आणि ५-६ दिवस घरात राहिला तरी नाशिवंत नसल्यामुळे, दुर्गंधीचा प्रश्नच उद् भवत नाही.
तरीही मनाला ही खंत होतीच की,
अजूनही मी त्या कचऱ्याच्या डोंगरात भर घालतेच आहे. कमी का असेना.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट पहिली, 
ज्यात एका छोट्याशा गावातल्या मुलांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या विटा बनवून त्यातून त्यांची शाळा उभी केली.
आता प्लास्टिकच्या विटा ही कन्सेप्टसुद्धा मार्केटमध्ये येऊन जुनी झाली. डोक्याच्या एका कोपऱ्यात ती होतीच.
मग आला मान्सून आणि ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रे
कर्स ज्या बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या बसमध्ये सोडून जायचे, त्या मी बॅगेत टाकून आईला देण्याच्या उद्देशाने घरी आणू लागले, कारण माझी आई त्या बाटल्या कापून त्यात भाज्यांची रोपं लावायची. 
पण मग त्या बाटल्यांचा वरचा भाग पुन्हा कचऱ्यात जायचा.
तर काही दिवसांपूर्वी पोळ्या लाटताना असंच विचारचक्र चालू झालं डोक्यात, आणि लिंक लागली..
थोडी ट्युबलाईटच आहे बरं का मी!!
या बाटल्यांमध्ये घरात येणारं पुनर्वापर न करता येणारं प्लॅस्टिक, ठासून ठासून भरायचं, की झाल्या प्लास्टिकच्या विटा तयार!
अशा विटा तयार करणाऱ्या आणि संकलित करणाऱ्या संस्था अनेक आहेत, तिकडे नेऊन तुम्ही या विटा दिल्यात की त्यांचा योग्य तो वापर होईल, याची खात्री आहेच की!
आणि डोन्ट वरी, अशी एक वीट तुमच्याकडे तयार व्हायला अनेक दिवस जातील, हे मला अनुभवाने समजलंय. गेल्या एक महिन्यात माझ्याकडच्या एका बाटलीत फक्त एक हॅन्डवॉशचे रिफिल पॅकेट आणि एक खाकऱ्याचे पाकीट गेले आहे.
अर्थात या रिझल्टसाठीसुद्धा बऱ्याच महिन्यांची प्लॅस्टिकमुक्त साधना लागते.
पण तोपर्यंत हे करून तर पहा!!
काही खूप मोठा टास्क नसणार आहे हा.
अगदी लहान मुलांचा खेळ आहे.
तो हवं तर घरातल्या छोट्या मुलांनाच द्या करायला.
नक्कीच जमण्यासारखं आहे.
आणि एक छोटुसा होमवर्क द्या तुमच्या मोबाईलवेड्या नेक्स्ट जनरेशनला..
प्लॅस्टिक ब्रिक किव्वा इको ब्रिक्स बद्दल शक्य तेवढं जाणून घेण्यासाठी गूगल करूदेत त्यांना.
त्यावरील व्हिडिओ त्यांच्यासोबत एकत्र बसून पहा आणि कृतीत आणा..
जग बदलेल हो, आधी आपण सुरुवात तर करू!

- समिक्षा साळुंके
- २६-०८-२०१९
... to be continued

1 comment: