Thursday, 29 August 2019

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी...

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी!
.
.
.
.
.
.
न्यूज चॅनेल वरच्या एका स्पेशल शो मध्ये ती म्हणत होती,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना पेट फुलेगा!"
आपल्या पृथ्वीच्या आजारी पडण्यामागे पण हेच सिक्रेट कारण आहे.
पॅकेट्सचं वाढतं प्रमाण.
आता थोडंसं स्वतःकडे पाहुयात.
थोडं टोचून बोलणारे मी, पण एवढी कळ काढाच.
फॉरेन मधल्या बायका, शिकल्या, कॉर्पोरेट जॉबला लागल्या,
आणि जेवण बनवायचं विसरून गेल्या.
त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सवय लागली फास्ट फूड ची
आणि रेडी टू मेक जेवणाची.
प्लॅस्टीकच्या पाकिटातून मिश्रण पाण्यात टाकायचं, ओव्हन मध्ये टाकायचं,
कि झालं जेवण तयार.
आणि प्लास्टिकचा कचरा सुद्धा !
आपल्या बायका हळू हळू चूल आणि मूल मधून बाहेर पडत आहेत,
नोकऱ्या करत आहेत, बिसनेस करत आहेत,
आणि थकून घरी येताना अगदी जेवण रेडी टू मेक आणत नसल्या ,
तरी, धान्याऐवजी पीठं, रेडिमेड भाजण्या, साफ केलेल्या भाज्या, वगैरे आणू लागल्यात.
आणि हे सगळं येतं, त्याच्या त्याच्या प्लास्टिकच्या पॅकेजिंग मधून.
म्हणजे जो कचरा अगदी अलीकडे पर्यंत होत नव्हता, तो व्हायला लागला.
आता मी काही याचं खापर ना बायकांच्या डोक्यावर फोडणार आहे, ना पुरुषांच्या...
आता एकमेकांकडे बोटं दाखवण्याची वेळ निघून गेली आहे.
आता फॅक्ट हि आहे, कि अगदी सहज टाळता येणारा कचरा घरात येतो आहे,
आणि तो येणार नाही यासाठी काहीतरी करायला हवंय.
कोणी?
तर आपण सगळ्यांनी.
जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला किव्वा पुरुष असाल, तर घरातल्या मुलांवर आणि मुलींवर घरकामात मदत करण्याचे संस्कार करा.
गृहिणी असलात तरीही, हे तुम्हाला लागू होतं.
सासू असाल, तर स्वतःच्या लेकाला, सुनेला घरकामात मदत करण्याचा सल्ला द्या.
कोणाचा नवरा असाल, तर स्वतःहून बायकांची अशी समजली जाणारी कामं देखील शिकून घ्या आणि शक्य तेवढी मदत बायकोला स्वतःहून करत चला.
शाळेत, कॉलेजात जाणारी मुलं असाल, तर आई वडीलांना घरातल्या कामांत स्वतःहून मदत करत चला.
घरकामं असतात किती?
देवपूजा, स्वच्छता, जेवण, बाजार आणि बिछाना.
प्रत्येकाने, आपली आपली जबाबदारी घ्यावी.
बायकोने बाजार आणला, नवऱ्याने भाजी साफ करायला घ्यावी,
नवऱ्याने साफसफाई केली, बायकोने जेवण बनवावं,
बायको भांडी घासत असेल, नवऱ्याने तोवर बिछाना टाकावा.
घरातल्या प्रत्येकाने आपलं ताट, वाटी, तांब्या, चहाचा कप स्वतः धुवून जागेवर ठेवावा.
लहान मुलांना त्यांचा त्यांचा बिछाना आणि पसारा आवरायला शिकवावा.
झाडू-लादी, टॉयलेट-बाथरूम साफ करण्याचं काम आळी - पाळीने करावं.
याने होईल काय माहितीये?
बायकांची कामं आणि कष्ट कमी होतील,
आणि त्यांना रेडिमेड काहीही आणावं लागणार नाही.
रेडिमेड आणणार नाहीत म्हणजे, प्लास्टिक घरात येणार नाही,
अल्टिमेटली प्लास्टिकचं उत्पादन कमी होईल.
अजून एक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे, सुपरमार्केट मधून पॅकेजिंग केलेल्या भाज्या, फळे, न घेता, गाडीवरून घ्याव्यात आपल्या कापडी पिशवीत.
आणि प्लास्टिक मधुन येणारे, वेफर्स, कुरकुरे, खारे शेंगदाणे, असं चकणा मटेरिअल, हौशी खवय्यांनी विकत घेण्यापेक्षा घरी तयार करावं किव्वा ड्रायफूटच्या दुकानातून सुट्ट विकत घ्यावं
(आपल्या घरातल्या पिशव्यांमध्ये किव्वा ओल्ड स्कूल स्टाईल कागदी आवरणात).
माझ्या (आयुष्यभर नोकरी केलेल्या ) आईने अजूनपर्यंत कोणाला असले चकणा आयटम खाऊ दिले नाहीत आणि विकत आणू दिले नाहीत , घरच्या घरी मक्याचे पोहे तळून त्यावर तिखट मीठ टाकलं कि झालं काम ! अर्थात घरातल्या कामात तिला आमची सर्वांची मदत असायची.
होय, बाबांची सुद्धा !
माझ्या (बँक मॅनेजर असलेल्या) सख्ख्या ताईने तिच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सकाळचा नाश्ता प्लास्टिकमध्ये न घेता स्वतःच्या डब्ब्यात घेण्याची सूचना केली आणि तिथे ती अमलात आणली गेली.
माझा नवरा मी घरी नसताना पोळी भाजी केंद्रातून भाज्या चपात्यांसाठी वेगळं प्लॅस्टिक न घेता, स्वतःच्या डब्यातून जेवण घरी आणतो. माझ्या या छोट्या छोट्या उद्योगांना पूर्ण साथ देतो.
आणि मी कधी आळशीपणा केलाच तर दम सुद्धा भरतो.
हि उदाहरणं देण्याचं कारण म्हणजे, 
एका बिझी मिडल क्लास कुटुंबाला देखील,
पर्यावरणाचं रक्षण करणं, सहज शक्य आहे
, हे आपल्या लक्षात यावं.
आपण शक्यतो आपल्या मुलांना बाहेरचं खाऊ देत नाही,
त्यामागे त्यांचं आरोग्य जपायचं कारण असत.
अगदी हीच गोष्ट करून आपण, आपलं आणि आपल्या पृथ्वीचं आरोग्य जपलं,
तर आपण आपल्या मुलाबाळांना एका निरोगी पर्यावरणात जगण्याची संधी देऊ शकतो.
हे तुम्हाला नको आहे का?
बघा बुवा, तुमचं डाएट पण सांभाळलं जाईल आणि
तुम्हाला पृथ्वी रक्षक म्हणून मिरवताही येईल, असा पर्याय दिलाय तुम्हाला !
तर या पुढे प्लास्टिक मधून अगदी काहीही विकत घेताना हि लाईन मनात आणा,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना कचरा बढेंगा !"
आणि विचारपूर्वक योग्य त्या आणि गरजेच्या वस्तूच, योग्य त्या ठिकाणाहून खरेदी करा.
- समिक्षा साळुंके
- २९-०८-२०१९
...to be continued

No comments:

Post a Comment