Sunday, 15 September 2019

खरंतर रियल लाईफ मध्ये असं नाही होत...

काल ऑफिसमध्ये एक गंमत झाली..

हाताने पेपरवर चित्र काढताना एक लाईन चुकली, 
म्हणून तिला खोडण्याऐवजी, मी डेस्कटॉप कडे पाहून डाव्या हाताने कंट्रोल झेड (अंडू ) केलं,
आणि माझा मूर्खपणा लक्षात आल्यावर डोक्यावर हात मारून घेतला.
शेजारी बसणाऱ्या दिव्या ताईने विचारल्यावर तिला सांगितलं, 
तर ती सहज म्हणाली, 
रियल लाईफ मध्ये पण असं कंट्रोल झेड असतं तर काय भारी ना?
आणि मग आम्ही ४-५ जण वेगळ्याच झोन मध्ये गेलो, सगळ्या शक्याशक्यता पडताळून पहिल्या! 
अर्धा तास मजेत गेला.
पण मग नंतर ताळ्यावर आलो,
अशी स्वप्नं रंगवली खरी,
पण खरंतर रियल लाईफ मध्ये असं नाही होत.

आपण बोललेलं एक चुकीचं वाक्य, 
लिहिलेलं एक चुकीचं उत्तर, 
घेतलेला एक चुकीचा निर्णय, 
आपल्या आयुष्यात उलथापालथ करतो,
आणि मग चूक मान्य करूनही आपल्याला मागे काही जाता येत नाही.

थोडे मोठे झाल्यावर आपण सर्वानीच हा डायलॉग एकदा तरी मारला असणार,
की " त्या वेळेपर्यंत मागे जात आलं ना, तर मी तो दुसरा पर्याय निवडेन.."
हो की नाही?

आता मात्र आपल्याकडे ताळ्यावर यायला फारसा वेळ नाहीये, खाडकन जागं व्हायला हवंय..
कारण आपण प्रगतीच्या नावाखाली असंख्य चूका आयुष्यात केल्या आहेत, 
आणि आपल्या पृथ्वीचं भयंकर, भरून न निघणारं नुकसान करून ठेवलंय.

आठवतंय ना?
आपल्याला मोठ्या गाड्या हव्या होत्या,
उंच इमारती हव्या होत्या,
लांबच्या प्रवासात ए सी हवा होता,
रस्ते मोठे हवे होते,
मग मुली असुदेत पण एक तरी मुलगा हवाच असाही अट्टाहास केला,
मग, घरं मोठी हवीत,
निसर्गाच्या कुशीत हवीत, वगैरे वगैरे,
आपण आपले लाड थांबवलेच नाहीत..
आणि धेडगुजरी प्रगती करून,
फालतू अंधश्रध्दांचं जाळं विणून,
सो कॉल्ड परंपरा जाग्या ठेवण्याच्या नादात,
आपल्या वसुंधरेला नासवून ठेवली.

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, की जाणीव असूनही आपण अजूनही तेच करतोय.
अजूनही आमची स्वप्न, मोठं घर, मोठी गाडी, एक मुलगी आणि एक मुलगा, याच्या पुढे जात नाहीत.

ऑलरेडी सर्वनाशाकडे निघालेले आपण,
मुलांच्या "कोणत्या" भविष्याची तरतूद करतोय नक्की?

समजतंय का आपल्याला, की या आपल्या कृत्याला अंडू (undo) नाही करता येणार आहे?

पृथ्वीचा झालेला नाश तर आपण भरून काढू शकत नाही, 
पण आत्ताच्या आत्ता लगेचच ताबडतोब थांबवू मात्र शकतो..

आहे का तयारी?

- समिक्षा साळुंके
- १३-०९-२०१९
...to be continued

Thursday, 12 September 2019

तुझं काम तू कर, तर जगाचं भलं होईल


किती जणांचे पालक त्यांना हे सांगतात ते माहीत नाही, 
पण मला माझ्या आई बाबांनी हेच शिकवलंय, 
की आपल्या कामाचा भार दुसऱ्यावर पडू द्यायचा नाही, 
आपली कामं आपली आपण करायची.

अगदी शाळेत सुद्धा आपल्याला नैतिक शिक्षण मध्ये हे धडे दिले असतील. हो की नाही?

मग मोठं झाल्यावर काय शिंगं फुटली वाटतं सगळ्यांना?

आपला पसारा आपण आवरावा, असं आपण मुलाबाळांना शिकवतो,
आणि आपला कचरा मात्र सरकारने काढावा अशी अपेक्षा करतो..!
अर्थात सरकारने काही गोष्टी करायला हव्यात हे जितकं खरं आहे, 
तितकंच खरं हेही आहे, की आपण स्वतःला खूप लाडवून ठेवलेलं आहे.

सरकारची कामं सरकार करत नाही, तर मी का टॅक्स भरायचा वगैरे बंड सगळेच पुकारतात.
सरकारकडून काही होणार नाही, आपणच केलं पाहिजे, असा विचार करून सरकारला फाट्यावर मारुन करणारे थोडे फार असतात..
आणि त्याहून कमी असतात, कायद्याच्या चौकटीत राहून, सरकारच्या निरनिराळ्या योजनांचा शोध लावून, त्याचा फायदा समाजकार्यासाठी करून घेणारे..

तर असो,
मुद्द्याला हात घालूयात..
काल जेजुरीच्या फॅक्टरीची गोष्ट वाचून, सचिन लिमये नावाच्या माझ्या मित्र काकांनी, मला एक फॉरवर्ड पाठवले.

ऊर्जा फौंडेशन तर्फे "my plastic is my responsibility" नावाने एक कॅम्पेन केलं जातं, 
ज्यात ते तुमच्या शहरात येऊन, एका ठिकाणी असं प्लॅस्टिक आणि इ-कचरा जमा करतात, 
आणि आपल्या जेजुरीच्या जादूच्या फॅक्टरीमध्ये पाठवतात.

आता या महिन्यात २२ तारखेला ते ठाणे आणि डोंबिवली मध्ये कलेक्शन साठी येणार आहेत.
तर आसपास राहणाऱ्यांनी, आपले प्लॅस्टिक आणि इ-वेस्ट एकत्र करून ठेवा..
खाली मी त्यांचा मेसेज सुद्धा पाठवत आहे.
तुम्हांला नक्की काय काय, कसं आणि कुठे द्यायचं ते त्या मेसेज मध्ये समजेल.

- समिक्षा साळुंके
- १२-१०-२०१९
...to be continued

Tuesday, 10 September 2019

जेजुरीतली जादूची फॅक्टरी !

लेखमाला चालू केल्यानंतर अनेक सूचना माघारी यायच्या.
काहीजण ज्ञानात भर घालण्यासाठी निरनिराळ्या लेखांच्या वेब लिंक्स पाठवायचे.

तसेच एकदा आईने एक लिंक पाठवली.
त्यातला कन्टेन्ट इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी त्यापुढे जाऊन अजून अभ्यास केला.
Plastic to Oil असं गूगल केलं की प्लास्टिक पायरोलिसिस च्या
जपानी संशोधनाबद्दल वगैरे प्रामुख्याने लिंक्स दिसतील.
भारतात, मुंबईत अशी काही सोय आहे का हे शोधायला लागले आणि
त्यातूनच सापडली पुण्याची मेधा ताई !


मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे.
प्लास्टिक बनवण्याची प्रक्रिया रिव्हर्स करून त्यापासून पुन्हा पेट्रोलियम बनवायची प्रक्रिया
त्यांनी शोधून काढली आणि हळू हळू करून खूप खूप मोठ्या प्रमाणावर ती अमलात आणली.

आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि रिसायकल न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकचं करायचं तरी काय?
त्यासाठी मी बऱ्याच जणांना प्लास्टिक ब्रिकचा पर्याय देत होते.
पण हा पर्याय अजून भारी आहे !

हे सगळं प्लास्टिक निरनिराळ्या शहरांमधून जमा केलं जातं आणि
ट्रक भरून प्लास्टिक जमलं कि ते जेजुरीच्या प्लान्टवर पाठवलं जात.
तिथे सर्वात आधी त्याची विभागणी केली जाते .
मग ते साफ करून त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात.
त्यांनंतर ते रिऍक्टर मध्ये टाकून त्याची प्रक्रिया चालू होते.
प्लास्टिक वितळून त्यातून निर्माण होणारा हानिकारक वायू हा वातावरणात न सोडता
त्याला या हीटिंग च्या प्रक्रियेसाठी वापरलं जातं.
आणि मग प्लास्टिक वितळवून त्याला ऑक्सिजनच्या अभावात तापवून त्याला वायुरूपात आणून तो वायू थंड करून त्यातून crude oil तयार केलं जातं .

हे तयार झालेलं पॉली फ्युएल (poly fuel ) केरोसीनच्या बदल्यात डायरेक्ट स्टोव्हमध्ये, बॉयलर्स मध्ये, भट्टीमध्ये वगैरे इंधन म्हणून वापरलं जाऊ शकतं.
त्यावर आणखी प्रक्रिया करून त्यातून डिझेल सुद्धा तयार होऊ शकतं .

साधारण १०० किलो प्लास्टिक मधून ५५ ते ७० लिटर इंधन मिळतं.
१५ ते २० किलो गॅस मिळतो.
आणि उरलेला पदार्थ हा रस्ते बनवण्याच्या कामी येतो.

वाचल्या वाचल्या मेधाताई ला मी मेल टाकून दिला, कि मी कशी मदत करू तुम्हाला?
तिकडून पुढच्याच दिवशी रिप्लाय आला ...
माझा फोन नंबर मागितला आणि प्लांट व्हिसिट साठी कधी येऊ शकता,
याची विचारणा झाली.
मग काय? मी तर जाणार आहे लवकरच भेट द्यायला.
कोणाला इच्छा असेल तर सगळे एकत्र जाऊन येऊ.

तर निष्कर्ष हा,
कि आता प्लास्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय, हे मी सांगायला नकोय.
तुम्ही प्लास्टिक ब्रिक बनवलीत तरी चालेल,
आणि तेच प्लास्टिक जमा करून एकत्र या प्लांट मध्ये रवाना केलेत तरी चालेल.
पण यापुढे आता घरात नाईलाजाने आलेलं प्लास्टिक सुद्धा कचऱ्याच्या डोंगरात जाणार नाही,
याची काळजी घेऊयात.

आणि कोणाला मेक इन इंडिया योजने अंतर्गत असा स्टार्टअप चालू करायचा असेल तर सोन्याहून पिवळं होईल , नाही का ?!

- समिक्षा साळुंके
- १०-०९-२०१९
... to be continued

Friday, 6 September 2019

अप्पर मिडल क्लास (उच्च मध्यम वर्गीय) लोकांची गोची...

गावाला एक बरं असतं, 
इथल्या लोकांना प्लॅस्टिक पॅकेजिंग मधील 
काही विकत घेण्याचा सोस किंवा स्कोप दोन्ही नसतो.. 
त्यामुळे त्यांच्याकडे एकदा प्लॅस्टिकची पिशवी आली, 
की ती जास्तीतजास्त वापर झाल्याशिवाय शक्यतो टाकली जात नाही..

पण, जेव्हा टाकली जाते, तेव्हा तिला काही कचऱ्याच्या गाडीत टाकली जात नाही किंवा 
रिसायकलिंगच्या दृष्टीने तिची विल्हेवाट लागत नाही.

याऊलट, आपल्या शहरांमध्ये प्लॅस्टिक रिसायकल करण्याच्या इतक्या सोयी सुविधा असतानाही, 
आपण आपला प्लॅस्टिकचा कचरा त्या कचऱ्याच्या डोंगरात भर म्हणून दान करतो..
आणि वर गरज नसताना अशा प्लॅस्टिक मधून रोज नव्या गोष्टी विकत सुद्धा घेतो.

आपण जरा मिडल क्लास मधून प्रमोट होऊन अप्पर मिडल क्लास झालो, 
की आपल्याला आपली नेहमीची खरेदीची ठिकाणे लो क्लास वाटू लागतात, 
आणि आपण स्वतःला अपग्रेड करण्याच्या नादात, प्लॅस्टिकच्या कचाट्यात सापडतो.

म्हणजे एरव्ही डाळ सुट्टी घेतली असती, 
आणि तिच्या सोबत आलेली पिशवी पुन्हा पुन्हा वापरली असती, 
तिथे आपण पुन्हा वापरता येणं शक्य नसलेल्या पॅकेट मधून 
पॉलिश केलेली डाळ विकत घेतो. 
मिठाई आणि ड्रायफ्रूट च्या दुकानातून कागदाच्या पुडीत बांधून मिळणारं फरसाण, 
हल्दीराम वगैरे ब्रँडच्या रीसायकल होऊ न शकणाऱ्या प्लॅस्टिक मधून विकत घेतो.

ही तर नुसती उदाहरणं आहेत..
असं किती प्लॅस्टिक आपण विनाकारण आपल्या आयुष्यात ऍड केलंय याची बेरीज करुया 
आणि शक्य तितक्या लवकर या नको त्या प्लॅस्टिकची वजाबाकी करायला सुरुवात करुयात !

गावी आपापल्या घरी 
अतिशय सोप्या अशा प्लॅस्टिक ब्रिक किंवा इको ब्रिक बद्दल सांगून, 
आपण, ओढ्यामधून नदीत आणि 
शेवटी समुद्रात जाऊन पडणाऱ्या प्लॅस्टिकचे मार्ग रोखू शकतो.

शहरात हे प्लॅस्टिक एका अनोख्या पद्धतीने रिसायकल करण्याची सोय आली आहे.
तिच्याबद्दल पुढच्या लेखात लिहीन..

- समिक्षा साळुंके
- ०६-०९-२०१९
...to be continued

Wednesday, 4 September 2019

मी ना, या देवाधर्माच्या पोस्ट्स आवर्जून वाचते...

मी ना, या देवाधर्माच्या पोस्ट्स आवर्जून वाचते
देवभोळी किंवा नास्तिक आहे म्हणून नाही, तर हे शास्त्र शास्त्र म्हणजे असतं तरी काय ते जाणून घेण्यासाठी. पटलं तर घेते नाहीतर सोडून देते.

त्यादिवशी सत्यनारायण पूजेसंदर्भात एक व्हॉट्सऍप पोस्ट वाचली, की कसं ही पूजा केल्याने घराचं वातावरण छान होतं वगैरे..

तर त्या सत्यनारायणाच्या पोस्टमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट होती..
पंचामृताने केलेला प्रयोग..
पुढे साक्षात श्री. अभय शरद देवरेंच्या शब्दांत दिला आहे.

"सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ? 
साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. 
दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. 
श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. 
असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. 
पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. 
अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत."

आता, मागे सांगितल्याप्रमाणे मी जरा ट्युबलाईट असल्यामुळे, माझ्या डोक्यात लिंक जरा लेट लागली.

गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आपण पंचामृत वापरतो, मोदकासाठी आणलेले नारळ ही घरात असतात, आणि नैवेद्यासाठी आपण निरनिराळ्या भाज्या या दिवसांत करतो, शिवाय रोज निर्माल्य तयार होतंच..

तुम्हांला नाही वाटत का, की हा मुहूर्त मस्त आहे आपापल्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी?

एक मोठी कुंडी, किव्वा एखादा जुना माठ घेऊनही सुरू करता येईल. अगदी खाली नारळाच्या शेंड्या आणि कवच फोडून टाकायचं, त्यावर पंचामृत, त्यावर भाज्यांचा ओला कचरा, पंचामृत, निर्माल्य, असे एकावर एक थर रचत जायचे रोज.
एकवीस दिवसांत, हे सर्व विघटन होऊन खत तयार होईल आणि त्यात एखादं छानसं फुल झाड लावता येईल.

मी तर म्हणेन, झेंडूचेच झाड लावा, आणि पुढील वर्षी, याच झाडाची फुले आपल्या गणेश पूजनात वापरा. शिवाय झेंडूचे झाड हे Mosquito Repellent म्हणजेच डांस आणि कीटकांना दूर ठेवणारे आहे.

तर या प्रयोगाचे फायदे अनेक आहेत, असं दिसतंय.
नुकसान असेल, तरी ते प्रयोग केल्याशिवाय तर कळणार नाही.

ज्यांच्या घरी सुदैवाने, गणपती बसविला जातो, त्यांच्यासाठीच हा मुहूर्त आहे बरं का!
पोस्ट थोडी लेट झाली असली, तरी पुन्हा एकदा पंचामृत आणि मोदकाचा घाट घालून 😋, याला सुरुवात कराच. 

शिवाय त्या पोस्टमध्ये वाचलं होतं, त्याप्रमाणे मोदक बुद्धिवर्धक असतात म्हणे..
आपल्याला काय, मोदक खायला अजून एक बहाणा मिळतोय, तर कशाला सोडा?

- समिक्षा साळुंके
- ०५-०९-२०१९
... to be continued

बाप्पाचं लायपोसक्शन...


सालाबादप्रमाणे याही वर्षी गणपती आले,
त्यांच्या स्वागतासाठी, टाळ आणि बाप्पा मोरयाचा जयघोष, पुरेसा होता की.. 
पण आम्हांला हवा होता, लाऊडस्पीकर आणि डीजे.. 
कारण आम्हाला लोकांना दाखवायचं होतं, की आमचाच बाप्पा ( ची मूर्ती ) सगळ्यात श्रेष्ठ आहे..

आम्हाला दहा दिवस बाप्पाचे लाड करण्यात काही इंटरेस्ट नाही,
आम्हाला बाप्पाला आम्हीच कसे त्याचे बाप आहोत, हे दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे!

गंमत अशी आहे ना, की
आम्हांला मुळात आता बुद्धीच्या आराध्य दैवताची आराधना करायचीच नाहीये,
आम्हाला आमची बुद्धी गहाण टाकून गणपतीच्या "मूर्तीची" स्पर्धा करायचीय.
आम्ही बाप्पावर, त्याने घडवलेल्या या जादुई प्रकृतीवर अन्याय केले कोट्यानु कोटी, 
आणि आपल्या मोरेश्वराने बिचाऱ्याने घातली आपली पापं त्याच्या पोटात..
त्यामुळे त्याचं पोट पण दुखू लागलं.
त्याला नीट मांडी घालून नेहमीच्या पोज मध्ये बसताही येईना,
तो आपल्या गादीवर आडवा तिडवा पसरायला लागला, गडबडा लोळायला लागला.
मग काही डॉक्टर मूर्तिकारांनी त्याची मोदक खाऊन खाऊन कष्टाने वाढवलेली ढेरी कापून टाकली 
आणि मग आमच्या बाप्पाची वाढ १८ फूट झाली.

त्याचं बाह्यरूप बदललं,
अंगावर वोर्निशचं तेज चढलं,
त्याचा गर्व वाढला,
समुद्रात खूप खोल विसर्जित केलं तरी तो पाण्याशी एकरूप होईनासा झाला!
मग समुद्राने सुद्धा त्याला अद्दल घडवायची ठरवली आणि दिला परत किनाऱ्यावर धाडून.
तेसुद्धा चांगलीच धुलाई करून, हात पाय तोडून..
आम्ही माणसांनी मग त्याची कचऱ्यासारखीच विल्हेवाट लावली.

बाप्पा चिडला...
त्याने पुढच्या वर्षी लवकर येऊन,
रागाने आमची बुद्धीच काढून घेतली,
आणि मग आम्ही सालाबादप्रमाणे डीजे लावून त्याचं पुन्हा स्वागत केलं.

.-- . | .- .-. . | .-.. --- -.- .. -. --. | ..-. --- .-. | - …. . | -.- .. -. --. |
--- ..-. | --- ..- .-. | …. . .- .-. - … 

-.-. …. . -.-. -.- | --- ..- - | ..-. .- -.-. . -... --- --- -.- | .--. .- --. . |
-. .- -- . -.. | -... .. --.- | -- .- ..-. .. .- 

-- .- -.- . | … ..- .-. . | -.-- --- ..- | .-. . .- -.. | 
. …- . .-. -.-- - …. . -. --. |  ..-. .-. --- -- | … - .- .-. - | - --- | . -. -..

- समिक्षा साळुंके
- ०४-०९-२०१९
... to be continued

Saturday, 31 August 2019

तुम्हाला काही जण कूपन देतात, काही जण पैसे.. पण काही जण अजून एक सुंदर पर्याय देतात...

काल दिलेला होमवर्क कोणी केला नसेलच असं गृहीत धरून चालूया,
कारण मला फक्त एकाच मित्राने त्याचा स्कोअर कळवलाय.
आणखी कोणी स्वतःच्या स्कोअरने शरम वाटून शेअर केलं नसेल, तर काही हरकत नाही..
आपला रिसायक्लिंगचा स्कोअर कसा वाढेल याकडे आपण अधिक लक्ष देऊयात.
तर माझा स्कोअर होता १५ पैकी १३,
कारण खरं सांगायचं तर E waste मी कधीच कचऱ्यात टाकलं नाहीये, पण त्याचं करायचं काय तेही मला माहीत नव्हतं. आणि कागद मी कंपोस्ट मध्ये वापरत असल्यामुळे रद्दीत देत नाही.
या लेखाच्या निमित्ताने, मलाही नवीन नवीन गोष्टी रोज वाचायला मिळतात आणि समजतात.
तर या वेबसाईटवर जाऊन सगळं मटेरीयल वाचायला मी तुम्हाला याकरता सांगत होते, कारण, माझं काम आहे तुम्हाला घरबसल्या पर्यावरणासाठी काय करता येईल ते सांगणं. आणि या रिसायकल गुरूने ते आणखी सोप्पं करून टाकलंय.
आता ही वेबसाईट तर बंगलोर मध्ये कार्यरत आहे.
पण गूगल केल्यावर असं लक्षात आलं, की मुंबई मध्ये देखील अशा अनेक संस्था आहेत, ज्या अगदी असंच काम करतात.
कॉल दिलात की तुमच्या घरी येऊन तो पुनर्वापर करता येण्याजोगा कचरा घेऊन जाणार.
त्या बदल्यात, तुम्हाला काही जण कूपन देतात, काही जण पैसे..
तर काही जण अजून एक सुंदर पर्याय देतात,
तो म्हणजे या वेस्ट मधून मिळालेले पैसे जातात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना, आणि त्याची पावती तुम्हांला घरपोच मिळते.
आता तुमचे आणि त्यांचे दोघांचे कष्ट आणि वेळ वाचवायला,
आपण काय करू शकतो?
तर आपण त्यांना कॉल देऊन एकदा आपल्या सोसायटीच्या मिटिंग मध्ये बोलवूयात,
त्यांना त्यांचं प्रेझेन्टेशन करूदेत.
त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कचऱ्याचं विभाजन करायचं कसं?
काय रिसायकल होऊ शकतं आणि काय नाही? 

तुम्हांला पटलं, तर त्यांना तुमच्या सोयीनुसार तारखा द्या पीक-अप ( pick up ) साठी. शक्यतो एका सोसायटीने एकाच दिवशी हा पीक-अप ठेवावा.
मी मुंबईत काम करणाऱ्या काही संस्थांच्या लिंक पुढे दिल्या आहेत, त्या एकदा बघा, किव्वा तुमच्या परिसरात असं काम करणाऱ्यांना शोधा, आणि हा प्रयोग करून तर पहा.
तुम्हांला हे काही करायचं नसेल, तर आपल्या पारंपरिक पद्धतीने का होईना,
कचऱ्याचे विभाजन करून शक्य तेवढ्या गोष्टी रिसायकल करा.
पण मला वाटतं, हा टास्क जेवढा टीम स्पिरिट ने चांगला केला जाईल,
तेवढा एकेकट्याने नाही होणार.
तुम्हाला काय वाटतं?

- समिक्षा साळुंके
- ३१-०८-२०१९
...to be continued

Friday, 30 August 2019

कचरा वाला वो नही, कचरा वाले हम है ।

कचरा वाला वो नही, कचरा वाले हम है ।

आठवतोय का तो व्हिडिओ?
काही महिन्यांपूर्वी फेसबुक वर, व्हॉट्सऍप वर फिरत होता?
किती साधीशी गोष्ट आहे नाही..
पण त्यानंतर किती मनापासून आपण आपल्या भाषेत फरक घडवून आणला!

माझीही तशीच काहीशी अपेक्षा होती..
कालपर्यंत जे लेख लिहिले, त्यावर मला खूप पॉसिटीव्ह रिप्लाय आले, की समिक्षा, मी ऑलरेडी असं असं करतो, मी माझ्यातर्फे असा असा कचरा होऊ देत नाही, आम्ही असं असं विसर्जन करतो, वगैरे वगैरे...
शिवाय अनेकांनी नव्याने काही गोष्टींची सुरुवात केली, आणि मला तसं कळवलं...

वाचून ऐकून मनाला बरं वाटलं, की शेकडो पृथ्वी रक्षक ऑलरेडी तयार झालेत. 
म्हणजेच माझ्या एकीच्या लेखनाने, शेकड्याने का होईना, फरक पडला जगात...
आता मात्र हा रिले थांबायला नको, चालत राहूदेत..
तुमच्याकडून आणखी शेकड्याने फरक पडुदेत..
आता जे तयार झालेत ते आणि जे अजूनही तयार नाहीत त्यांनी,
स्वतःला एक प्रश्न विचारा..
मी पुरेसे प्रयत्न करतोय का?
Are my efforts enough?
शंकेची पाल चुकचुकली,
तर पुढच्या लिंक वर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक पणे द्या,
आणि स्वतःच तपासून पहा!

शिवाय ही वेबसाईट पूर्णपणे चाळून काढा. 
काही फार नाहीये वाचायला, पण जे आहे, ते महत्त्वाचं आहे.
आणि तुमच्या मनातल्या अनेक शंकांची उत्तरं देखील तिथे आहेत.

आजच्या दिवसात एवढं कराच..पुढच्या लेखात आपण यातल्या काही मुद्द्यांवर बोलू..

- समिक्षा साळुंके
- ३०-०८-२०१९
...to be continued

Thursday, 29 August 2019

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी...

करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकर ने एक सिक्रेट सांगितलं मला त्यादिवशी!
.
.
.
.
.
.
न्यूज चॅनेल वरच्या एका स्पेशल शो मध्ये ती म्हणत होती,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना पेट फुलेगा!"
आपल्या पृथ्वीच्या आजारी पडण्यामागे पण हेच सिक्रेट कारण आहे.
पॅकेट्सचं वाढतं प्रमाण.
आता थोडंसं स्वतःकडे पाहुयात.
थोडं टोचून बोलणारे मी, पण एवढी कळ काढाच.
फॉरेन मधल्या बायका, शिकल्या, कॉर्पोरेट जॉबला लागल्या,
आणि जेवण बनवायचं विसरून गेल्या.
त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सवय लागली फास्ट फूड ची
आणि रेडी टू मेक जेवणाची.
प्लॅस्टीकच्या पाकिटातून मिश्रण पाण्यात टाकायचं, ओव्हन मध्ये टाकायचं,
कि झालं जेवण तयार.
आणि प्लास्टिकचा कचरा सुद्धा !
आपल्या बायका हळू हळू चूल आणि मूल मधून बाहेर पडत आहेत,
नोकऱ्या करत आहेत, बिसनेस करत आहेत,
आणि थकून घरी येताना अगदी जेवण रेडी टू मेक आणत नसल्या ,
तरी, धान्याऐवजी पीठं, रेडिमेड भाजण्या, साफ केलेल्या भाज्या, वगैरे आणू लागल्यात.
आणि हे सगळं येतं, त्याच्या त्याच्या प्लास्टिकच्या पॅकेजिंग मधून.
म्हणजे जो कचरा अगदी अलीकडे पर्यंत होत नव्हता, तो व्हायला लागला.
आता मी काही याचं खापर ना बायकांच्या डोक्यावर फोडणार आहे, ना पुरुषांच्या...
आता एकमेकांकडे बोटं दाखवण्याची वेळ निघून गेली आहे.
आता फॅक्ट हि आहे, कि अगदी सहज टाळता येणारा कचरा घरात येतो आहे,
आणि तो येणार नाही यासाठी काहीतरी करायला हवंय.
कोणी?
तर आपण सगळ्यांनी.
जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला किव्वा पुरुष असाल, तर घरातल्या मुलांवर आणि मुलींवर घरकामात मदत करण्याचे संस्कार करा.
गृहिणी असलात तरीही, हे तुम्हाला लागू होतं.
सासू असाल, तर स्वतःच्या लेकाला, सुनेला घरकामात मदत करण्याचा सल्ला द्या.
कोणाचा नवरा असाल, तर स्वतःहून बायकांची अशी समजली जाणारी कामं देखील शिकून घ्या आणि शक्य तेवढी मदत बायकोला स्वतःहून करत चला.
शाळेत, कॉलेजात जाणारी मुलं असाल, तर आई वडीलांना घरातल्या कामांत स्वतःहून मदत करत चला.
घरकामं असतात किती?
देवपूजा, स्वच्छता, जेवण, बाजार आणि बिछाना.
प्रत्येकाने, आपली आपली जबाबदारी घ्यावी.
बायकोने बाजार आणला, नवऱ्याने भाजी साफ करायला घ्यावी,
नवऱ्याने साफसफाई केली, बायकोने जेवण बनवावं,
बायको भांडी घासत असेल, नवऱ्याने तोवर बिछाना टाकावा.
घरातल्या प्रत्येकाने आपलं ताट, वाटी, तांब्या, चहाचा कप स्वतः धुवून जागेवर ठेवावा.
लहान मुलांना त्यांचा त्यांचा बिछाना आणि पसारा आवरायला शिकवावा.
झाडू-लादी, टॉयलेट-बाथरूम साफ करण्याचं काम आळी - पाळीने करावं.
याने होईल काय माहितीये?
बायकांची कामं आणि कष्ट कमी होतील,
आणि त्यांना रेडिमेड काहीही आणावं लागणार नाही.
रेडिमेड आणणार नाहीत म्हणजे, प्लास्टिक घरात येणार नाही,
अल्टिमेटली प्लास्टिकचं उत्पादन कमी होईल.
अजून एक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे, सुपरमार्केट मधून पॅकेजिंग केलेल्या भाज्या, फळे, न घेता, गाडीवरून घ्याव्यात आपल्या कापडी पिशवीत.
आणि प्लास्टिक मधुन येणारे, वेफर्स, कुरकुरे, खारे शेंगदाणे, असं चकणा मटेरिअल, हौशी खवय्यांनी विकत घेण्यापेक्षा घरी तयार करावं किव्वा ड्रायफूटच्या दुकानातून सुट्ट विकत घ्यावं
(आपल्या घरातल्या पिशव्यांमध्ये किव्वा ओल्ड स्कूल स्टाईल कागदी आवरणात).
माझ्या (आयुष्यभर नोकरी केलेल्या ) आईने अजूनपर्यंत कोणाला असले चकणा आयटम खाऊ दिले नाहीत आणि विकत आणू दिले नाहीत , घरच्या घरी मक्याचे पोहे तळून त्यावर तिखट मीठ टाकलं कि झालं काम ! अर्थात घरातल्या कामात तिला आमची सर्वांची मदत असायची.
होय, बाबांची सुद्धा !
माझ्या (बँक मॅनेजर असलेल्या) सख्ख्या ताईने तिच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सकाळचा नाश्ता प्लास्टिकमध्ये न घेता स्वतःच्या डब्ब्यात घेण्याची सूचना केली आणि तिथे ती अमलात आणली गेली.
माझा नवरा मी घरी नसताना पोळी भाजी केंद्रातून भाज्या चपात्यांसाठी वेगळं प्लॅस्टिक न घेता, स्वतःच्या डब्यातून जेवण घरी आणतो. माझ्या या छोट्या छोट्या उद्योगांना पूर्ण साथ देतो.
आणि मी कधी आळशीपणा केलाच तर दम सुद्धा भरतो.
हि उदाहरणं देण्याचं कारण म्हणजे, 
एका बिझी मिडल क्लास कुटुंबाला देखील,
पर्यावरणाचं रक्षण करणं, सहज शक्य आहे
, हे आपल्या लक्षात यावं.
आपण शक्यतो आपल्या मुलांना बाहेरचं खाऊ देत नाही,
त्यामागे त्यांचं आरोग्य जपायचं कारण असत.
अगदी हीच गोष्ट करून आपण, आपलं आणि आपल्या पृथ्वीचं आरोग्य जपलं,
तर आपण आपल्या मुलाबाळांना एका निरोगी पर्यावरणात जगण्याची संधी देऊ शकतो.
हे तुम्हाला नको आहे का?
बघा बुवा, तुमचं डाएट पण सांभाळलं जाईल आणि
तुम्हाला पृथ्वी रक्षक म्हणून मिरवताही येईल, असा पर्याय दिलाय तुम्हाला !
तर या पुढे प्लास्टिक मधून अगदी काहीही विकत घेताना हि लाईन मनात आणा,
"जितना पॅकेट खुलेगा, उतना कचरा बढेंगा !"
आणि विचारपूर्वक योग्य त्या आणि गरजेच्या वस्तूच, योग्य त्या ठिकाणाहून खरेदी करा.
- समिक्षा साळुंके
- २९-०८-२०१९
...to be continued

Tuesday, 27 August 2019

आपली गोमाताच जर ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभूत ठरत असेल तर?

गायीला आपण माता मानतो,
पण ही गोमाताच जर ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभूत ठरत असेल तर?
.
.
.
.
.

आपण गाईंचे पालन दूध दुभत्यासाठी करतो.
अगदी आपल्या आजूबाजूला नसलं, तरी पृथ्वीवर अनेक देशांत, गाईचं पालन,
हे 'बीफ'साठीसुद्धा, म्हणजे मांस उत्पादनासाठी केलं जातं.
याला मागणीच जास्त असल्याने हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

आता समस्या ही आहे, की या गोमाता, किव्वा अन्य रवंथ करणारे प्राणिजन,
जेव्हा विष्ठा बाहेर टाकतात,
तेव्हा त्याच्यातून निर्माण होणारा मिथेन वायू,

हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा २३ पटींनी जास्त हानिकारक आहे ,
जो कि ग्लोबल वॊर्मिंगला कारणीभुत ठरतो.
एकदम अभ्यासू लोकांनी आकडेवारी जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन लेख वाचा.
बाकीच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा!

https://timeforchange.org/are-cows-cause-of-global-warming-meat-methane-CO2

तर आता आपण काय करू शकतो?
गोहत्या हा तर काही उपाय नाही.
पण उत्पादन कमी होऊ शकतं.
कसं?
सोप्पंय!
मागणी कमी व्हायला हवी.


बंद नव्हे, कमी.

बीफच्या दिवान्यांनी बीफ खाणे बंद करावं किंवा खूप कमी करावं.
आणि आपण बाकीच्यांनी, दुधाचे पदार्थ (dairy products) खाणे कमी करावं.

ज्यामध्ये खव्याची मिठाई सुद्धा येते बरं!

मान्य आहे , कि खाण्या-पिण्याच्या सवयी बदलायला सांगते,
म्हणजे जरा जास्तच पर्सनल होतेय मी..
पण आता हा पृथ्वी रक्षणाचा मामलाच खूप पर्सनली घेतलाय मी ..
आणि तुम्ही पण घ्यायलाच हवाय ,
कारण आता फक्त स्वतःची शुगर वाढून नव्हे ;
तर ग्लोबल टेम्परेचर वाढून जीवावर बेतणार आहे .

आणि मी दूध व दुधाचे पदार्थ खाणे बंद करा असं म्हणतच नाहीये मुळात.
आपल्याला प्रत्येकाला फक्त ते प्रमाण नेहमीपेक्षा ५०% कमी करायचंय. एवढं तर कोणालाही नक्की जमेल!


आता आपल्याला वाटेल, मी एकट्याने कमी करून थोडीच काही होणार आहे!
खरं आहे, एकाने फरक नाही पडणार, पण एक - एकाने फरक पडणार.

तुम्हाला एक ग्राहक म्हणून स्वतःची ताकद आजमावून पाहता येईल का?

जे त्या लिंकवरील लेख वाचणार नाहीयेत त्यांना मी त्यातला सारांश सांगते..

The most important conclusion for ourselves is: Eat much less meat and dairy products. This is one of the most effective ways to reduce our personal carbon footprint and to generally reduce our personal negative impact on the environment.

Finally a quote from Albert Einstein (Nobel prize 1921): Nothing will benefit human health and increase chances for survival of life on Earth as much as the evolution to a vegetarian diet.

- समिक्षा साळुंके
- २८-०८-२०१९
... to be continued

आज फक्त वेळ काढायला लिहितेय मी..

तुमच्या आयुष्यातली १७ मिनिटे एवढा वेळ काढायचाय मला, तुम्हाला काहीतरी दाखवायला.

हा एक छोटासा होमवर्क आहे आजचा.
आणि खूप मस्त आहे.

माझ्याच एक मित्राने खूप कष्टाने खूप अभ्यास करून सगळ्यांना समजेल अशा साध्या सोप्प्या भाषेत
" ग्लोबल वॉर्मिंग " म्हणजे काय भानगड तरी काय आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केलाय..
तो बोलत इंग्लिश मध्ये असला तरी सांगतोय चित्रभाषेत..

त्यामुळे मन लावून ही १७ मिनिटे दिलीत,
तर तुम्हाला यापुढे येणाऱ्या माझ्या काही "आउट ऑफ द बॉक्स" पोस्ट्सचं आश्चर्य वाटणार नाही!

तुम्ही माझे लेख वाचून बोअर होत नाही म्हणजे हा व्हिडिओ पाहताना देखील बोअर होणार नाहीत, याची मला खात्री आहे.
पण जरी कंटाळा आला, तरी 'औषध कडूच असतं, पण बरं वाटायला हवंय तर घ्यायला पाहिजे' असं समजून पूर्ण डोस घ्या!

https://youtu.be/3CM_KkDuzGQ

तसंच तुमच्या मित्र परिवाराला आणि परिवाराला सुद्धा पाहायला लावा.

आणि तुमचे विचार मला कमेंट करून कळवा..
म्हणजे आपल्याला या लेखमालेची पुढची दिशा ठरवणं सोप्पं जाईल.

- समिक्षा साळुंके
- २७-०८-२०१९
...to be continued

Monday, 26 August 2019

ते राहणार आहेत तिथेच, करोडो वर्षं...

शहराबाहेर तयार होणारे कचऱ्याचे डोंगर,
त्या रस्त्याने जाताना नाक बंद करून थोडीच जमीनदोस्त होणारेत.
ते राहणार आहेत तिथेच,
करोडो वर्षं.
आपण क्रशर चालू करून,
आहेत ते डोंगर फोडतोय कशासाठी?
याच कचऱ्याच्या डोंगरांना जागा करण्यासाठी ना!
गोष्ट झाली अशी, की मी गेल्या वर्षीपासून घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करायला सुरुवात केली.
एक दोन आठवड्यांत माझ्या लक्षात आलं,
की मी जवळ जवळ ५-६ दिवसांनीच कचऱ्याचा डबा बाहेर ठेवतेय.
कारण कचरा जास्त होतंच नव्हता,
आणि ५-६ दिवस घरात राहिला तरी नाशिवंत नसल्यामुळे, दुर्गंधीचा प्रश्नच उद् भवत नाही.
तरीही मनाला ही खंत होतीच की,
अजूनही मी त्या कचऱ्याच्या डोंगरात भर घालतेच आहे. कमी का असेना.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट पहिली, 
ज्यात एका छोट्याशा गावातल्या मुलांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या विटा बनवून त्यातून त्यांची शाळा उभी केली.
आता प्लास्टिकच्या विटा ही कन्सेप्टसुद्धा मार्केटमध्ये येऊन जुनी झाली. डोक्याच्या एका कोपऱ्यात ती होतीच.
मग आला मान्सून आणि ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रे
कर्स ज्या बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या बसमध्ये सोडून जायचे, त्या मी बॅगेत टाकून आईला देण्याच्या उद्देशाने घरी आणू लागले, कारण माझी आई त्या बाटल्या कापून त्यात भाज्यांची रोपं लावायची. 
पण मग त्या बाटल्यांचा वरचा भाग पुन्हा कचऱ्यात जायचा.
तर काही दिवसांपूर्वी पोळ्या लाटताना असंच विचारचक्र चालू झालं डोक्यात, आणि लिंक लागली..
थोडी ट्युबलाईटच आहे बरं का मी!!
या बाटल्यांमध्ये घरात येणारं पुनर्वापर न करता येणारं प्लॅस्टिक, ठासून ठासून भरायचं, की झाल्या प्लास्टिकच्या विटा तयार!
अशा विटा तयार करणाऱ्या आणि संकलित करणाऱ्या संस्था अनेक आहेत, तिकडे नेऊन तुम्ही या विटा दिल्यात की त्यांचा योग्य तो वापर होईल, याची खात्री आहेच की!
आणि डोन्ट वरी, अशी एक वीट तुमच्याकडे तयार व्हायला अनेक दिवस जातील, हे मला अनुभवाने समजलंय. गेल्या एक महिन्यात माझ्याकडच्या एका बाटलीत फक्त एक हॅन्डवॉशचे रिफिल पॅकेट आणि एक खाकऱ्याचे पाकीट गेले आहे.
अर्थात या रिझल्टसाठीसुद्धा बऱ्याच महिन्यांची प्लॅस्टिकमुक्त साधना लागते.
पण तोपर्यंत हे करून तर पहा!!
काही खूप मोठा टास्क नसणार आहे हा.
अगदी लहान मुलांचा खेळ आहे.
तो हवं तर घरातल्या छोट्या मुलांनाच द्या करायला.
नक्कीच जमण्यासारखं आहे.
आणि एक छोटुसा होमवर्क द्या तुमच्या मोबाईलवेड्या नेक्स्ट जनरेशनला..
प्लॅस्टिक ब्रिक किव्वा इको ब्रिक्स बद्दल शक्य तेवढं जाणून घेण्यासाठी गूगल करूदेत त्यांना.
त्यावरील व्हिडिओ त्यांच्यासोबत एकत्र बसून पहा आणि कृतीत आणा..
जग बदलेल हो, आधी आपण सुरुवात तर करू!

- समिक्षा साळुंके
- २६-०८-२०१९
... to be continued