Sunday, 15 September 2019

खरंतर रियल लाईफ मध्ये असं नाही होत...

काल ऑफिसमध्ये एक गंमत झाली..

हाताने पेपरवर चित्र काढताना एक लाईन चुकली, 
म्हणून तिला खोडण्याऐवजी, मी डेस्कटॉप कडे पाहून डाव्या हाताने कंट्रोल झेड (अंडू ) केलं,
आणि माझा मूर्खपणा लक्षात आल्यावर डोक्यावर हात मारून घेतला.
शेजारी बसणाऱ्या दिव्या ताईने विचारल्यावर तिला सांगितलं, 
तर ती सहज म्हणाली, 
रियल लाईफ मध्ये पण असं कंट्रोल झेड असतं तर काय भारी ना?
आणि मग आम्ही ४-५ जण वेगळ्याच झोन मध्ये गेलो, सगळ्या शक्याशक्यता पडताळून पहिल्या! 
अर्धा तास मजेत गेला.
पण मग नंतर ताळ्यावर आलो,
अशी स्वप्नं रंगवली खरी,
पण खरंतर रियल लाईफ मध्ये असं नाही होत.

आपण बोललेलं एक चुकीचं वाक्य, 
लिहिलेलं एक चुकीचं उत्तर, 
घेतलेला एक चुकीचा निर्णय, 
आपल्या आयुष्यात उलथापालथ करतो,
आणि मग चूक मान्य करूनही आपल्याला मागे काही जाता येत नाही.

थोडे मोठे झाल्यावर आपण सर्वानीच हा डायलॉग एकदा तरी मारला असणार,
की " त्या वेळेपर्यंत मागे जात आलं ना, तर मी तो दुसरा पर्याय निवडेन.."
हो की नाही?

आता मात्र आपल्याकडे ताळ्यावर यायला फारसा वेळ नाहीये, खाडकन जागं व्हायला हवंय..
कारण आपण प्रगतीच्या नावाखाली असंख्य चूका आयुष्यात केल्या आहेत, 
आणि आपल्या पृथ्वीचं भयंकर, भरून न निघणारं नुकसान करून ठेवलंय.

आठवतंय ना?
आपल्याला मोठ्या गाड्या हव्या होत्या,
उंच इमारती हव्या होत्या,
लांबच्या प्रवासात ए सी हवा होता,
रस्ते मोठे हवे होते,
मग मुली असुदेत पण एक तरी मुलगा हवाच असाही अट्टाहास केला,
मग, घरं मोठी हवीत,
निसर्गाच्या कुशीत हवीत, वगैरे वगैरे,
आपण आपले लाड थांबवलेच नाहीत..
आणि धेडगुजरी प्रगती करून,
फालतू अंधश्रध्दांचं जाळं विणून,
सो कॉल्ड परंपरा जाग्या ठेवण्याच्या नादात,
आपल्या वसुंधरेला नासवून ठेवली.

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, की जाणीव असूनही आपण अजूनही तेच करतोय.
अजूनही आमची स्वप्न, मोठं घर, मोठी गाडी, एक मुलगी आणि एक मुलगा, याच्या पुढे जात नाहीत.

ऑलरेडी सर्वनाशाकडे निघालेले आपण,
मुलांच्या "कोणत्या" भविष्याची तरतूद करतोय नक्की?

समजतंय का आपल्याला, की या आपल्या कृत्याला अंडू (undo) नाही करता येणार आहे?

पृथ्वीचा झालेला नाश तर आपण भरून काढू शकत नाही, 
पण आत्ताच्या आत्ता लगेचच ताबडतोब थांबवू मात्र शकतो..

आहे का तयारी?

- समिक्षा साळुंके
- १३-०९-२०१९
...to be continued

No comments:

Post a Comment